JanmaachI Goshta
जन्माची गोष्ट
२० सप्टेंबरच्या रात्री दवाखान्यात दाखल झाले. आयुष्यात पहिल्यांदाच. आई आणि मी त्या गरम तापलेल्या खोलीत होतो. नर्सने सांगितलेलं,'खिडक्या उघडू नका, मच्छर येतात,' त्यामुळे बाहेरच्या हवेचा संपर्क नव्हता. कपडे बदलून पुस्तक वाचत पडले.कसं कोण जाणे नऊ महिन्याचं वाट पहाणं त्या क्षणी एकदम संपल्यासारखं वाटलं. उरली होती ती फक्त आतुरता - दुसया दिवशीची. शांत झोपही लागली अगदी! पोटातली हालचाल मात्र अव्याहत सुरुच होती. त्या जीवाला माहितही नव्हतं की फक्त ९-१० तासांनी जग बदलणार आहे.
२१ ला सकाळी आंघॊळ आणि बाकिचे वैद्यकिय सोपस्कार उरकून पुन्हा येऊन पडले. ८:३० वाजण्याची वाट पहात. आईने कपाळावरून हात फिरवला, नवऱ्याने प्रेमाने हात धरला, सासूबाईंनी हसून धीर दिला. त्या सगळ्यांच्या डोळ्यात काय काय होतं - काळजी, आतुरता, आनंद. एकदाचे ८:३० वाजले. पोट सांभाळत चालत चालत 'त्या' खोलीकडे गेले. सगळं कसं वातानुकुलीत होतं. रुटीन चेहेऱ्याच्या एक-दोन नर्सेस, दाई, उपकरणं, टेबलं, मोठे मोठे दिवे, सगळंच कसं थंडगार. पण हिरव्या मास्कमागचे ऍनेस्थेटिस्ट डोळे प्रेमळ हसले आणि सगळं छान वाटलं. पुढचं सगळं म्हणावं तर धुकं, म्हणावं तर स्पष्ट. डॉक्टरांच्या रिलॅक्स मूडमधील गप्पा, दिव्यांचे झोत, शस्त्रांची किणकिण, नर्सेसचं कुजबुजणं, मधेच एखादीचं माझ्याशी स्मित. एका क्षणी सगळे आवाज थांबले - निदान माझ्यासाठी. ऐकू आला तो एक नाजूक किणकिणता कोऽहम. तो क्षण तसाच आहे माझ्या मनात. अजूनही तिथेच थांबलाय. मला एकदम उठावसं वाटलं, कुणाशी तरी बोलावसं वाटलं. मी इकडे तिकडे पाहिलं तर एक नर्स हळूच माझ्या डोळ्यांच्या कडा टिपत होती. मग ते प्रेमळ ऍनेस्थेटिस्ट डोळे जवळ आले, कपाळावर ऊबदार हात आला, " it's a beautiful baby girl." कसा शब्दात बांधू मी तो क्षण. खरंच शक्य नाहिये. मला तिला बघायचं होतं, भेटायचं होतं, तिच्याशी खूप खूप बोलायचं होतं. पण थांबावं लागलं. बराच वेळ. कारण मी एकदम धुक्यात गेले. सगळं ऐकत होते पण आकळत नव्हतं. थांबावं लागणारच होतं.
नर्सनी ते चिमुकलं गाठोडं माझ्या हातात ठेवलं आणी एकदम मन थरथरलं.दोन क्षण कळेचना काय करावं. किती ते नाजूक. जवळ घ्यावं तर माझ्या श्वासाचा त्रास होईल. बघतच राहिले. तीहि बघत होती किलकिल्या डोळ्यांनी. कुतुहल नव्हतं, आश्चर्य नव्हतं. शांत डोळे पण भावहीन मात्र नव्हते ते डोळे. मी तिला दिसत तरी होते की नाहि कुणास ठाऊक. पण स्पर्शाची भाषा मात्र कळत होती, तिची मला अन माझी तिला. अशीच ही मोठी होईल रडेल, हसेल, वळेल, बोलेल, उभी राहील, धावेल, चालायला लागेल आणि पंखात बळ आलं की जाईल उडून भूर्रकन. चिमणीसुद्धा अशीच पिलांच्या चोचीत चारा घालताना विचार करत असेल का?
हे सगळं कसं कालचच वाटतंय आणि आज सान्वी एवढी मोठी झाली - झालीसुद्धा. कळलंच नाही असं तरी कसं म्हणायचं! प्रत्येक क्षणाची नोंद आहे - वहित... मनात.सुरुवातीची ती जाग्रणं, ती काळजी. बाळाला हाताळण्याची ती भिती. हे करू की ते करू असे संभ्रम. सगळं कसं ताजं आहे. ती रडली की रडूच येई, असं वाटे आपलं काहितरी चुकतंय. पण मग, 'अगं बाळ आहे ते रडणारच!' असं मोठ्यांचं समजावणं मनाला शांत करत असे. हे दिवस असेच फडफडत उडुन जातात पण आठवणींची मोरपिसं मागे उरतात. तीच वेचायची मनाच्या पानापानांत जपून ठेवायची. लहर आली कधी की त्यावरून हात फिरवायचा. ती हळूवार डोळ्य़ांवरून, गालावरून हळूहळू फिरवायची.
आता स्पर्शाच्या भाषेबरोबरच डोळ्यांची भाषाही बोलू लागलीये ती. किती बदललेत तिचे डोळे. सुरुवातीचे ते किलकिले डोळे आता चांगलेच टपोरे झालेत. जिभेच्या अखंड अगम्य सुरावटींबरोबरच हे डोळ्यांचं बोलकेपण वाढलंय. त्यात आता प्रतिबिंब दिसायला लागलीयेत. परक्याच्या हातात गेल्यावर 'आई, तू आहेस ना!' असं बावरलेल्या नजरेनं मला विचारतात. झोप आली, भूक लागली की 'आई, घे ना!' असं विनवतात. मधूनच कधीतरी 'मला घे, तुला बिलगायचंय' असा पुकारा करतात. 'मला खूप मज्जा येतेय' असं म्हणत खिदळतात आणि 'I love you आई असं तर दिवसातून किती वेळा सांगतात.
आईचं आणि मुलीचं किती हळवं नातं. शारिरीक नाळ तुटली तेव्हाच भावनिक नाळ जोडली गेली. आता त्या नाळेनं जखडून ठेवायचं कि आधारासारखी बांधून मुलीला पुढे जाऊ द्यायचं हे प्रत्येक आईनं ठरवायचं.
माझं आणि सान्वीचंही एक नातं उमलतंय. एक जग फुलतंय. आई मुलीच्या नात्याचं, स्त्रीवाच्या बंधाच, मैत्रिणीच्या रंगाचं. ते तसंच फुलत रहावं - तुमच्या सगळ्यांच्या आशिर्वादानं.