KshaN
हळवे हळवे क्षण हिरवे होत जातात
आणि भाळता भाळता एक दिवस सांभाळायला लागतात हिरव्याकच्चं क्षणांवर दवबिंदूंची नक्षी
ओलेत्या वेळेला मुकं धुकं साक्षी
हिरवाईला ताजं करून दवबिंदू जातात उडून
हलके हलके तरंगणारं धुकंही जातं विरुन
आयुष्य लख्ख ऊजाडतं
सोनेरी होऊन जातं
कोवळे क्षण
प्रखर क्षण
पुन्हा हळवे होत जातात
रुपेरी उबेत पापण्या मिटून
चांदनी चांदनी साठवत राहतात.