Gulmohor, me...
खूप दिवसांनी आज गुलमोहोराला भेटले
सगळा सुकुन गेला होता
फांदि न फांदि वाळली होती
उभा होता एकटाच
कावळ्यांच ओझं सांभाळत
समोरचा वड केव्हाच पडला होता
तिथला औदुंबर आता पुढे आला होता
त्याच्या मागची बांबूची दाटी
शीळ मारत सळसळत होती
शेजारची अबोली नेहेमीप्रमाणे मंद हसली
अशोक वृक्षानं मान हलवून ओळख दिली
कुंपणाजवळची छोटी रोपं
केवढीतरी उंचावली होती
माझा गुलमोहोर मात्र गप्पच होता
थोडासा उदास थोडासा केविलवाणा.
त्याच्या बुंध्यावरून हात फिरवला
आणि घशात एकदम खरखर झाली
किती वय झालं याचं
किती ऋतु गेले असे
प्रेमात पडून, बहरून, सुखावून
किती तरी दिवस झाले
हळूच त्याची काटकी गळली
गुलमोहोरानं स्मित केलं
पूर्वीच्या कितीएक आठवणी
पुन्हा एकवार दाटून आल्या
मी म्हटलं कसा आहेस?
तो पुन्हा एकवार हसून म्हणाला,
काही थोडी पानं आहेत
तीच काय ती हिरवाई
आताशा सावलीसुद्धा पडत नाही
आणि एकदम गप्प झाला...
मी ही तशीच परत फिरले
उंच झालेल्या बोगनवेलीवर
कागदी फुलं शोभत होती
पहात पहात पुढे गेले
आणि एकदम जाणवलं---
आपण किती मोठे झालो !
0 Comments:
Post a Comment
<< Home